Sunday, October 26, 2008

अमेरिकेतला पहिला दिवस...!

या series मधली पहिली पोस्ट ही अमेरिकेत ज्या दिवशी लैंड झालो तो दिवस ...! हा दिवस महत्वाचा यासाठी की मी भरपूर घाबरलेलो होतो... अर्थातच 'अमेरिकेला' येतोय म्हणुन हे सांगायला नको ...! हा माझा पहिला 'इंटरनेशनल' प्रवास होता... भारतात भरपूर वेळा विमनाने प्रवास केला होता पण भरताबाहेर पहिल्यांदाच... आणि सोबत कुणी नव्हते त्यामुळे ज़रा गोंधळलेला होतो ... अमेरिका कशी असेल याची खुप उत्सुकता होती... मी मुंबईवरून निघालो आणि लंडन मार्गे न्यूयार्कला येणार होतो ... न्यूयार्क वरून पुढे परत कोन्नेक्टिंग फ्लाईट ने raleigh ( राले ) ला येणार होतो.... Raleigh ला माझ्या साठी होटेल बुक केलेलं होतं। मुंबई वरून निघाल्यावर - तासात आम्ही लंडनला उतरलो इकडे मला - तास थाबुन न्यूयार्कची फ्लाईट घ्यायची होती ... लंडन ला पोहचे पर्यंत आजू बाजूला सगळी भारतीय होती त्यामुळे मी एकदम comfortable होतो... लंडनच्या 'हीथ्रो' विमान तळावर भरपूर भारतीय दिसत होती ... अर्थात गोरे पण होतेच ( या नंतर मी सगळ्या अमेरिकन आणि इंग्रज लोकांना गोरेच म्हणणार ... हा गोरे शब्द मी इतिहासातल्या 'गोरे' या शब्दाला समानार्थी वापरतो आहे .... यांना गोरे म्हटलं की उगाच आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो...) !

लंडनच्या विमान तळावर 'सिक्यूरिटी चेक' च्या वैतागातुन बाहेर पडत मी कशीबशी पुढची फ्लाईट पकडली ..... विमानात येउन बघतो तर आजुबाजुला एकही भारतीय दिसत नव्हता..... सगळे गोरे (आणि अर्थातच गो-रया सुद्धा.... ) आता मात्र मी अमेरिकेत या सगळ्या गो-रयासोबत कसा दिसेल याचा विचार करू लागलो .... तेव्हढ्यात ' What would you like to have in lunch sir?' असा आवाज माझ्या कानावर आला.... तो कुणाचा होता हे सांगायला नको ...! मी प्रेमाने हसतमुख होउन बोललो ' Vegeterian Please!' यावर तिकडून अनपेक्षित प्रतिकिया आली 'Sorry sir we don't have it...!' मग मी हतबल होवून -' Can I have some juice?' यावर तिने भरपूर ज्युसांची नावं सांगितली ... मी आपलं - to be on safer side--- "Orange Juice Please !" पुन्हा खोटा-खोटा कोंफीडन्स आणि खोटी खोटी स्माईल देत बोललो...!

ज्यूस दिल्यानंतर - ' Let mi check if we have something for you sir ' असं बोलून ती भवानी गेली ( तिला भवानी का म्हणतो ते तुम्हाला कळेलच लवकर ) आणि हातात एक ब्रेड ( आपण ज्याला मराठीत पाव म्हणतो ) आणि Butter घेउन आली ... 'This is all we have sir...!' स्माईल देत ती बोलली (स्माईल खरी की खोटी ती मला माहित नाही- पण भुकेल्या माणसाला ती खरी कशी वाटणार? ) ... काहीच नसल्यापेक्षा काहीतरी बरं.. असा विचार करत मी ते घेतलं... (आणि माझं अमेरिकेत गेल्यावर काय होणार .... नव्हे काय-काय होणार याच्या विचारात मी गुंतलो )

बराच वेळ मी तो ब्रेड आणि ज्यूस मन भरून खाल्ला ( पोट तर भरत नव्हतं पण मन भरलं तर पोटाला तेवढाच आधार ...) इतक्यात 'Excuse me!!!' असा आवाज कानावर पडला... हा आवाज माझ्या बाजूला बसलेल्या गो-रया काकांचा होता ...! (कुणास ठावुक का??? पण या गो-रयांना काका-काकू म्हनन्यात मला खुप मजा येते ) 'Would you like to have this?' असं म्हणत त्यानी मला त्यांचा ब्रेड अन बटर ऑफर केला ....! माझं आणि भवानीचं सागळं बोलणं काकांनी ऐकलेलं होतं आणि कदाचित त्यांना माझी कीव आली असेल असा माझा प्राथमिक अंदाज....! मी सहजच 'No Thanks...!' म्हणत ऑफर नाकारली... अर्थात हो म्हणायला काहीच हरकत नव्हती पण मी स्वाभिमानी भारतीय युवक हो कसा म्हननार ? खरं सांगायचं म्हणजे त्या गो-रया (भल्या माणसाचा) मन मोकळा स्वाभाव मला जरा खटकला...! एखादा गोरा आपल्याशी चांगला वागू शकतो हेच मला पटत नव्हतं ! हेच ब्रेड मला जर एखाद्या भारतीय काकांनी दिलं असतं तर कदाचित मी घेतलं ही असतं...!

आणि मग एक ब्रेड आणि ज्यूस च्या आधारावर मी न्यूयार्कला पोहोचलो....! आता समोर होता तो सगळ्यात महत्वाचा टप्पा - इमिग्रेशन आणि कस्टम्स !!! आपण सगळे याला जरा घाबरतो पण सहसा तसं चेह-र् यावरून दाखवत नाही ।हे तर माझं पहिलच इमिग्रेशन चेक होतं॥ त्यामुळं माझ्या मनातले असंख्य विचार इकडे सांगायला नको ..... पण कंपनीचं नाव आणि माझं शिक्षण शिवाय माझा निरागस चेहरा ( समोरच्या गो-रया धिप्पाड साहेबाला बघून जरा जास्तच निरागस झाला होता - एकदा इमिग्रेशन झाला की मग बघू सगळ्याना हा पण विचार होता मनात!!!) याच्या जोरावर सगळं निवांत पार पड़लं....!

आता कोन्नेक्टिंग फ्लाईटला थोड़ा वेळ होता म्हणुन एकदा घरी फ़ोन करून आपण इकडे पोहोचल्याचं सांगायचं होतं शिवाय अमेरिकेतल्या मित्रांना पण तसं कळवयच होतं! पण इकडे कुठेच STD बूथ दिसत नव्हता... आता काय करायचं??? जागोजागी pay-phone दिसत होते म्हणुन मग मी जरा ट्राय मारायच ठरवलं.... लगेच लक्ष्यात आलं की माझ्याकडे कोईन्स नाहीत !!!

इकडे कुणाला कोईन्स माघन्यापेक्षा काहीतरी विकत घेतलं की मिळतील कोईन्स... आणि जरा भूक पण लागली होतीच म्हणुन मी काहीतरी खायचं ठरवलं ! पण एअरपोर्ट वर काहीच ओळखीचं दिसत नव्हतं ... -रयाच वेळानंतर 'MacD' सापड़लं (खरं सांगायचं म्हणजे त्याचही फक्त नाव ओळखीच होतं )... आत जावून बघतो तर एकही आइटम काळत नव्हता मग परत - to be on safer side एक कॉफी घ्यायची ठरवली ...! लगेच काउंटर वर जावून ' one coffee please!' आर्डर दिली ... 'What size?' ... aaaa जरा इकडे तिकडे बघत 'Medium' बोललो ... तिने लगेच बील फाड़लं आणि 'One Seventy Five' बोलली म्हणजे -एकशे पंच्याहत्तर!!!! "एकशे पंच्याहत्तर डॉलर????" माझ्या मनातला पहिला विचार!!!! १७५ * ४२ करण्याचा प्रयत्न केला पण काही जमेना... "नाही इतकी महाग नसेल कॉफी !!!" माझ्या मनातला दूसरा विचार !!! मग "एकशे पंच्याहत्तर रुपये का???? पण छ्छे ती मला रुपयात बील कसं देईल???" माझ्या मनातला तीसरा विचार ....! आता काय करायच ...? मी खिश्यातुन १० डॉलर काढून तिला दाखवत विचारलं-" Will this be enough ?" तिने पहिल्यांदा नोट बघून आणि मग मला बघून कसलं तरी विचित्र expression देत हात समोर केला आता मला कळलं की 'One Seventy Five' म्हणजे दहा डॉलर पेक्षा कमी असले पाहिजेत ...! तिने मला आठ डॉलर २५ सेंट्स परत केले ...(म्हणजे कॉफी एक डॉलर पंच्याहत्तर सेंट्स ला होती....) एक क्वार्टर म्हणजे चारआने (डॉलर मधले ) हे मला आता कळलं होत !! मी तिला लगेच विचारलं "Can I get few Quarters Please?" तिने लगेच मला दोन डॉलर आठ क्वार्टर परत दिले....! आणि एक दीव्य पार पड़लं ...! मी अमेरिकेतला पहिला धड़ा शिकलो ...! (अर्थातच मी ती कडवट कॉफी फेकूनच दिली आणि माझं काय होणार या विचाराने जरा tense झालो!!!)

pay-phone वर बराच वेळ खेळल्यानंतरही फ़ोन काही लागेना ....! मग कुणाची तरी मदत घ्यायची ठरवलं...! एका भारतीयाला विचारलं तर त्याने तो फ़ोन कधी वापरला नव्हता असं तो बोलला आणि निघून गेला... मग एका गो-रयाने कहितर मदत करायचा प्रयत्न केला पण त्याला काही जमलं नाही... बीचा-रयाने 'Customer Care' ला फ़ोन करून विचारान्याचा सल्ला दिला.... तिकडे मला पहिल्यांदा भारतीय आणि गो-रयामधला फरक लक्षात आला.... कमीत कमी गो-रयाने मदत करण्याची तयारी तरी दाखवली... असो!

शेवटी माझा फ़ोन काही लागला नाही.... माझ्या पुढच्या फ्लाईट ची वेळ झाली होती म्हणुन मी तो नांद सोडला . Raleigh ला पोहोचल्यावर मात्र मी माझ्या मित्राला (जो मला एअरपोर्ट वर receive करायला येणार होता) फ़ोन करू शकलो कारण त्याचा नंबर इकडे लोकल होता. न्यूयार्क एयरपोर्ट वर नेशनल आणि लोकल नंबर मध्ये माझा जरा गोंधळ उडाल्याचं माझ्या लक्षात आलं...! मी फ़ोन करू शकल्यामुळे मित्र मला receive करायला येऊ शकला नाही ... मग मी त्याला सरळ होटलवरच भेटायचं संगीतलं...! आणि मी टैक्सी करून होटलला जायला निघालो .....!

यापुढचा प्रवास पण जरा मनोरंजकच आहे पण तो पुढच्या ब्लॉग मध्ये... मराठीत टाइप करून करून वैतागलोय मी आता ...!